लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये कधीपासून? उदय सामंतांनी दिला मोठा शब्द; वाढीव हप्त्याबाबत महत्त्वाची घोषणा!


रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा २१०० रुपयांच्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होत असताना उर्वरित ६०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. अशातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानामुळे वाढीव आर्थिक मदतीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

‘तो’ शब्द पूर्ण करणार; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. हे आश्वासन विसरलेलो नाही, तर योग्य वेळी त्याची पूर्तता केली जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १,५०० रुपयांवरून २,१०० रुपयांपर्यंत हप्ता वाढवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात सामंत यांनी हे भाष्य केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या आधार देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार असून ती बंद होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

निवडणुकीतील आश्वासनाची अद्याप प्रतीक्षाच!

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही योजना सुरू केली. महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात ही रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेचा महायुतीच्या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

१ कोटी ६६ लाख महिलांना मिळतोय लाभ

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यापूर्वी योजना सुरूच राहणार असल्याची भूमिका मांडली आहे.

६०० रुपयांच्या वाढीव हप्त्याचं काय?

उदय सामंत यांनी सरकार २,१०० रुपये देण्याचा शब्द पाळणार असल्याचे सांगितले असले, तरी वाढीव रक्कम नेमक्या कोणत्या महिन्यापासून मिळणार, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी महिलांना दरमहा १,५०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. आता सरकार या आश्वासनाची अंमलबजावणी कधी करणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात २,१०० रुपये कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!