खाजगी सावकारांचा जाच ठरला जीवघेणा? शिरूरमध्ये एकाची आत्महत्या; ५ जणांविरोधात गुन्हा, आरोपींची नावे गुलदस्त्यात


पुणे : शिरूर (जि. पुणे) येथे व्याजाने घेतलेल्या पैशांची व्याजासह परतफेड करूनही पुन्हा लाखो रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सततचा वसुलीचा तगादा आणि मानसिक त्रासाला कंटाळून संजय बलदोटा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याप्रकरणी ऋषभ संजय बलदोटा (वय २८, रा. सैनिक सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ऋषभ बलदोटा आणि त्यांचे वडील संजय बलदोटा यांनी काही व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांची व्याजासह पूर्ण परतफेड करण्यात आली होती. मात्र, तरीही संबंधितांकडून आणखी २३ लाख रुपयांची मागणी केली जात होती.

इतकेच नव्हे, तर पैशांच्या वसुलीसाठी अनोळखी व्यक्तींना घरी पाठवून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीकडून घेतलेल्या पैशांच्या व्याजापोटी १२ लाख रुपये देण्यासाठीही तगादा लावला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वसुलीच्या तगाद्यामुळे टोकाचे पाऊल

सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय बलदोटा यांनी गुरुवारी (ता. २६) सकाळी सव्वा आठच्या सुमारास शिरूर येथील पाण्याच्या टाकीजवळ आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी आरोपींची नावे आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईची अधिकृत माहिती पोलिसांकडून समोर आलेली नाही. संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आरोपींना अटक झाली आहे का आणि त्यांची नावे जाहीर का करण्यात आली नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले की, संबंधित घटना गंभीर स्वरूपाची आहे. या प्रकरणातील काही आरोपी पुणे शहरातील आहेत. आरोपींची नावे जाहीर केल्यास ते दूरवर पळून जाण्याची शक्यता असल्याने नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!