पोलिसांत तक्रार देऊन घरी परतली, पण ४० मिनिटांत काळाने घात केला! सोन्याची अंगठी अन् दुचाकीसाठी छळाचा आरोप; सोलापुरातील घटनेने खळबळ


सोलापूर : माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणारा कथित छळ अखेर एका विवाहितेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या त्रासाविरोधात तिने अखेर पोलिसांकडे मदत मागितली. पतीसह सासरच्या चौघांविरोधात तक्रारही दाखल झाली. मात्र, या तक्रारीनंतर अवघ्या ४० मिनिटांत तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. या घटनेने सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मृत विवाहितेचे नाव ज्ञानेश्वरी रोहित जाधव असे आहे. या प्रकरणात तिचा पती रोहित, सासरे विलास, सासू जयश्री आणि नणंद अश्विनी यांच्याविरोधात हुंडाबळी आणि छळासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या चौघांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता.

दुचाकी आणि सोन्याच्या अंगठीची मागणी; दोन वर्षांपासून त्रास?

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी पुण्यातील वानवडी परिसरातील केदारीनगर येथे राहत होती. मागील दोन वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून तिला त्रास दिला जात असल्याचे तिचे म्हणणे होते. माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी घेऊन यावी, यासाठी पतीसह अन्य सदस्यांकडून तगादा लावला जात असल्याचा आरोप तिने केला. मागण्या पूर्ण न झाल्याने शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून छळ होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

रात्री ८.३५ वाजता तक्रार, ९.१५ वाजता मृत्यूची माहिती!

सततच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरीने २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा नोंदवला. मात्र, त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांनी म्हणजे रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी तिच्या मृत्यूची माहिती समोर आली.

घरातील पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने घेतला गळफास

पाथरुट चौकातील राहत्या घरी ज्ञानेश्वरीने छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिचे वडील पांडुरंग यांनी तातडीने तिला अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

पोलिसांत तक्रार दाखल करूनही काही वेळातच घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, ज्ञानेश्वरीने केलेल्या आरोपांची सत्यता आणि घटनेमागील परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा छळ झाल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!