पुण्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपलं! माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं निधन; शिक्षण, विकास आणि सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा मागे
पुणे : पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान देणारे माजी आमदार रामभाऊ गेणबा मोझे यांचं सोमवारी (१३ जुलै) वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रामभाऊ मोझे यांच्या पश्चात पत्नी रुख्मिणी, दोन पुत्र संजय व ज्ञानेश्वर, विवाहित कन्या, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. राजकारणासोबतच शिक्षण आणि समाजकारणात त्यांनी उभारलेलं कार्य हे त्यांचं कायम स्मरणात राहणारं योगदान मानलं जात आहे.
१९७५ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सलग तीन कार्यकाळ नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. पुढे १९८५ मध्ये तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून निवडून येत त्यांनी सलग तीन वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

स्वातंत्र्यसैनिक गेणबा मोझे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत रामभाऊ मोझे यांनी त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. आज या संस्थांमार्फत प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय यशस्वीपणे चालविले जात आहेत. बालेवाडी, चऱ्होली, वडगाव शेरी आणि येरवडा परिसरातील शैक्षणिक विकासात त्यांच्या संस्थांचं मोठं योगदान आहे.

विकासकामांच्या बाबतीतही रामभाऊ मोझे यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. मुठा नदीच्या डाव्या बाजूच्या शहर भागासाठी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन उभारणे, कर्वेनगर (कोपरे पुनर्वसन गावठाण) आणि खडकी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, बालेवाडी परिसरात महापालिकेची पाणीपुरवठा योजना सुरू करणे, औंध येथील मुळा नदीवरील नवीन पुलासाठी आर्थिक मंजुरी मिळवून देणे, तसेच वाघोली परिसरातील १४ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विश्रांतवाडी येथे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५०० घरांच्या निवासी प्रकल्पासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.
राजकारण, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि समाजकारण या चारही क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ प्रभावी कामगिरी करणारे रामभाऊ मोझे यांच्या निधनाने पुण्याने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा पुढील अनेक वर्षे पुण्याच्या विकासाच्या इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे.