शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेततळ्यासाठी ७५ हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील ४,७२६ लाभार्थी निश्चित

पुणे : शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवून सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील वैयक्तिक शेततळे घटकासाठी पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर काढण्यात आलेल्या सोडतीद्वारे या लाभार्थ्यांची निवड झाली असून, शेततळ्याच्या आकारानुसार शेतकऱ्यांना कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालयाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, अर्जदार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. या नोंदणीमुळे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती तपासणे प्रशासनाला सोपे होणार आहे.

तालुकानिहाय निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आंबेगाव ३४७, बारामती ५१८, भोर १३१, दौंड ३८५, हवेली ७३, इंदापूर ८७४, जुन्नर ४६५, खेड ३३६, मावळ ९१, पुणे शहर ८०, मुळशी १, पुरंदर ८२९, शिरूर ५४५ आणि वेल्हे ५१. यामध्ये इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील सर्वाधिक शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासून घ्यावी. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळणे आवश्यक आहे. ही मंजुरी मिळण्यापूर्वी शेततळ्याचे काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
