भयंकर पाऊस!! राज्यात ‘या’ महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज, जाणून घ्या…

पुणे : देशभरात मान्सूनचं वेळीआधी आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती सध्या मंदावली आहे. १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रवास थांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही निवडक भागांमध्येच हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या बदललेल्या हवामानामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे, ज्यामुळे काही प्रमाणात उष्णता जाणवू शकते.
मात्र, दुसरीकडे, जुलै महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘हाहाकार’ माजणार असल्याचा भयानक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील मान्सून पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यांसारख्या विविध निकषांवर आधारित करण्यात आला आहे. यामुळे पावसाचे प्रमाण अधिक राहील, पण त्याचा पॅटर्न बदललेला असेल, असे दिसते.
वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून आणि जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगाव, कोल्हापूर यांसारख्या ठिकाणी पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे.
याउलट, दापोली, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे, पुणे आणि कराड येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. विशेषतः, जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून, कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड राहतील, असे हवामान राहणार आहे. याचा अर्थ, कमी वेळात जास्त पाऊस पडू शकतो, ज्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.