लाडक्या बहिणींना मिळणार 6000 रुपये? चार महिन्यांच्या थकित हप्त्यांबाबत मोठी माहिती समोर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करूनही गेल्या काही महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले नसल्याची तक्रार आहे.

अशा महिलांसाठी आता दिलासादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रखडलेले चार महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित महिलांना एकूण 6 हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे 3 हजार रुपये तसेच एप्रिल आणि मे महिन्यांचे 3 हजार रुपये अशा दोन टप्प्यांत रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र, यासंदर्भात अद्याप शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली असून काही महिलांची नावे योजनेच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, पात्र असूनही अनुदान न मिळालेल्या महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतरच रखडलेल्या हप्त्यांबाबत स्पष्टता येणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.