पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू, भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली..

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली.
यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
दरम्यान, या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.