मध्यरात्री ‘मदतीचा हात’ की लुटीचा सापळा? गाडी बंद पडताच चौघांनी रचला कट; पुण्यात चालकाला 2 लाखांचा गंडा

पुणे : रात्री उशिरा रस्त्यावर गाडी बंद पडली आणि मदतीसाठी काही अनोळखी व्यक्ती पुढे आल्या तर सावध राहा! कारण पुण्यात अशाच एका ‘मदतीच्या’ बहाण्याने वाहनचालकाला निर्जन ठिकाणी नेऊन तब्बल दोन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोंढवा परिसरातील कौसरबाग भागात घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी रात्री एका व्यावसायिकाची कार अचानक बंद पडली. वाहन सुरू करण्यासाठी आणि जवळचे गॅरेज शोधण्यासाठी तो प्रयत्न करत असताना चार अनोळखी व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या.
‘जवळच चांगले गॅरेज आहे, आम्ही मदत करतो,’ असे सांगत या चौघांनी वाहनचालकाचा विश्वास संपादन केला. मात्र ही मदत नसून आधीपासून आखलेला सापळा असल्याचे पुढे स्पष्ट झाले. आरोपींनी चालकाला एका अंधाऱ्या आणि निर्जन मैदानाच्या दिशेने नेले. तेथे पोहोचल्यानंतर संभाषणाच्या बहाण्याने त्याचे लक्ष विचलित करण्यात आले.

याच क्षणाची वाट पाहत असलेल्या आरोपींनी कारच्या मागील सीटवर ठेवलेली पर्स, महागडा मोबाईल फोन आणि रोख रक्कम लंपास केली. काही वेळानंतर सामान गायब असल्याचे लक्षात येताच चालकाच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र तोपर्यंत चौघेही घटनास्थळावरून पसार झाले होते.

या चोरीत एकूण 1 लाख 92 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळी वाहन बिघाड झाल्यास अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, अधिकृत रोडसाईड असिस्टन्स सेवा किंवा पोलिस हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात मदतीच्या नावाखाली लुटीचे प्रकार वाढत असल्याने वाहनचालकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.