पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग! 60% जमीन संपादन पूर्ण, शेतकऱ्यांकडे फक्त 2 दिवस..

पुणे : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक जमीन संपादन प्रक्रिया झपाट्याने सुरू असून प्रशासनाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, संमतीपत्र सादर करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी 60 टक्क्यांहून अधिक क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 1 हजार 837 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर केली असून त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे.
सुरुवातीला काही प्रमाणात विरोध असला तरी आता अनेक शेतकरी प्रकल्पाला सहकार्य करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विमानतळ उभारणीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडल्याचे मानले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि परिसरातील हवाई वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भूसंपादनासाठी पात्र शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया देखील सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 900 कोटी रुपयांचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप संमतीपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांच्यासाठी ही अंतिम संधी मानली जात आहे. प्रशासनाने दिलेल्या मुदतीनुसार अवघ्या दोन दिवसांनंतर संमतीपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदत संपल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे विमानतळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग आणखी मोकळा होणार आहे.