‘प्रोजेक्ट एक्स’चा थरार उघड! विमानातून आले पार्टीबाज, कोट्यवधींचा जल्लोष; पुणे पोलिसांच्या छाप्याने उडाली खळबळ

पुणे : शहरापासून दूर, आलिशान बंगल्यात सुरू होता रात्रीचा जल्लोष… महागड्या गाड्यांचा ताफा, विमानातून आलेले पाहुणे, विदेशी मद्याची रेलचेल आणि कानठळ्या बसवणारे संगीत! मात्र या हायप्रोफाईल ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर पुणे पोलिसांनी अचानक धाड टाकत संपूर्ण रॅकेटच उघड केले. या कारवाईनंतर पुणे आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात ही पार्टी सुरू होती. गुप्त माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेने छापा टाकला असता, नियमांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांची डीजे साऊंड सिस्टिम, लाखो रुपयांचे विदेशी मद्य, हुक्का साहित्य आणि गांजाही जप्त करण्यात आला. या प्रकरणी 78 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित बंगला सील करण्यात आला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या पार्टीसाठी दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, राजस्थानसह विविध राज्यांतील तरुण-तरुणी पुण्यात दाखल झाले होते. काही जण थेट विमानाने तर काही जण लक्झरी कारमधून पार्टीसाठी आले होते. त्यामुळे ही केवळ साधी हाऊस पार्टी नसून मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असल्याचा संशय पोलिसांना आहे.

कारवाईदरम्यान अनेक जण संशयास्पद अवस्थेत आढळल्याने 23 जणांचे रक्तनमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालात अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर आणखी गंभीर कलमे लावली जाणार आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. “शहराबाहेरील बंगल्यांमध्ये किंवा फार्महाऊसमध्ये कायद्याचे उल्लंघन करून पार्ट्या आयोजित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘प्रोजेक्ट एक्स’च्या नावाखाली नेमके काय सुरू होते? या पार्टीमागे कोणाचा आर्थिक पाठिंबा होता? आणि बाहेरील राज्यांतील तरुण-तरुणींची उपस्थिती कशासाठी होती? याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातून आणखी मोठे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.