काळजी घ्या, सुरक्षित रहा! राज्यात तुफान पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, नद्यांना महापूर…

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड पाऊस सुरू आहे. या काळात सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची, गुरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करा, सतर्क रहा, सुरक्षित रहा कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

यामध्ये मुंबई तुफान पाऊस सुरू असून शाळा बंद करण्यात आल्या असून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याठिकाणी असलेल्या इसापूर धरणाचे नऊ, सातनालाचे तीन, काटेपूर्णाचे सहा, पेनटाकळीचे नऊ तर खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुरात वाहून गेल्याने यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. अतिवृष्टीमुळे धोका टाळण्यासाठी चिखली तालुक्यातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती.

पावसात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. शेळगाव आटोळ येथील चेतन वसंत बोर्डे (२२) हा तरुण १७ ऑगस्टला शेळ्यांना पाला आणण्यासाठी गाव शिवारात गेला होता. दुपारी एकच्या सुमारास नदी पार करताना पाय घसरून तो पुरात वाहून गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.