वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणे अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी: हर्षवर्धन सपकाळ; अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला, मुस्लीम समाजाचा केला विश्वासघात…

मुंबई : भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांधशक्तीच्या बाजूला जावून बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लीम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या.
मुस्लीम समाजाच्या पाठीमागे आहे असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लीम समाजाचा विश्वासघात केला. वक्फ विधेयक हे केवळ मुस्लीम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. उद्या वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनी हे सरकार लाडक्या उद्योगपतींच्या घशातच घालणार आहे हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला माहित नाही असे नाही.
पण सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या अजित पवारांनी खुर्चीसाठी भाजपासमोर लाचार होऊन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी हा मुस्लीम समाजाला दिलेला धोका आहे. त्यामुळे अजित पवार यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेने लक्षात घेऊन सावध व्हावे असा इशाराही काँग्रेसचे प्रांताध्यक्षांनी दिला आहे.