हिंदुत्व हीच आमची ओळख!! आघाडी ‘इंडिया’ च्या बैठकीआधी ठाकरे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन…

मुंबई : देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील एकूण २६ पक्ष उपस्थित राहणार आहेत.
बैठकीच्या पहिल्या दिवशी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले असून या दोन दिवसीय बैठकीत वेगवेगळ्या महत्त्त्वाच्या मुद्द्यांव चर्चा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीच्या मानचिन्हाचे (लोगो) अनावरण केले जाणार आहे.
त्याचवेळी सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने गुरुवारी मुंबई विमानतळाबाहेर उद्धव यांचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे लावले. विमानतळापासून सभेच्या ठिकाणी भगवे झेंडे आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.
पोस्टरवर ठळक अक्षरात ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत’ असे लिहिले आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भारतीय कामगार सेना (यूबीटी) या आघाडीच्या संघटनेचे सचिव संतोष कदम यांनी सांगितले की, मुंबई विमानतळाबाहेर भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. ही आमची ओळख आहे. हिंदुत्व हीच आपली ओळख असून भारतात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत, असे ते म्हणाले.