राज्याचे मुख्यमंत्री अदानी यांचे मार्केटिंग मॅनेजर, कृषिमंत्र्यांच्या तोंडाला लगाम नाही, राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात…

शिरोळ : अवकाळी पाऊस, खताचे लिंकीग मधून होणारी शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटर सक्ती, पिकविमा घोटाळा, वाढलेली महागाई यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या तोंडाला लगाम नसल्याने बेताल वक्तव्ये करत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री हे सौरउर्जेचे सोलर पॅनेल खपविण्यासाठी अदानीचे मार्केटींग मॅनेंजर झाल्याने राज्यातील शेतकरी मातीमोल झाला असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.
शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आगामी जि. प. व पंचायत समिती निवडणुका, महापूर, अवकाळी पाऊस, खताचे लिंकीगमधून होणारी शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटर विरोधी जनआंदोलन, पिकविमा घोटाळा, कर्जमाफी व उस दराच्या पुढील आंदोलनाबाबतची दिशा ठरविण्यासंदर्भात टारे क्लब येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, राज्य सरकारकडून चळवळी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीधर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडून सामान्य जनतेच्या मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आपल्या प्रश्नांची व अडचणींची जाणीव करून दिली पाहिजे.
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. राज्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व मंत्र्यांचे दौरे असताना सातत्याने नजरकैदेत ठेवले जात आहे. राज्य सरकार शेती प्रश्नावर व महागाई कमी करण्याबाबत अपयशी ठरले आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी मार्फत ताकदीने निवडणुक लढविण्याच्या सुचना राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
आज झालेल्या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल चौगुले व स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी वठारे व स्वाभिमानी युवा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदासह विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आली. यावेळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार आण्णाप्पा पाणदारे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्याच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात स्वाभिमानी पक्षाचे सचिव डॅा. महावीर अक्कोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.