अशोक पवारांना धक्का! चार संचालक फुटले; शिरूर खरेदी विक्री संघावर आमदार ज्ञानेश्वर कटके गटाचे वर्चस्व..

शिरूर : शिरूर खरेदी विक्री संघाच्या सभापतिपदी राजेंद्र नरवडे यांची, तर माजी आमदार अशोक पवार यांच्या पॅनेलमधून सत्ताधारी गटाकडे आलेले बाळसाहेब नागवडे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली.
या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या गटाचे सातपैकी तब्बल चार संचालक फुटून आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पॅनेलला मिळाले आहेत. यामुळे आता शिरूर खरेदी विक्री संघही त्यांच्या हातातून गेला आहे. चार संचालकांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी कटके गटाला अधिकच बळकटी आली आहे.
याबाबत फुटीची कुणकुण लागल्यानेच माजी आमदार पवार यांनी पदाधिकारी निवडीतून मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उपसभापती बाळासाहेब नागवडे यांच्यासह अशोक पवारांच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या चार संचालकांनी आज सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा दिला, त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले बहुतांशी संचालक हे पूर्वाश्रमीचे अशोक पवारांचे समर्थक आहेत, त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत चमत्कार घडेल, अशी चर्चा होती. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना अशोक पवार गटाला सुरूंग लावल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते.
चित्र दिसत असताना अशोक पवारांनी दोन दिवसांपूर्वीच आपण निवडणुकीत लक्ष घालणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशोक पवार गटाच्या फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. सुमारे दोन ते तीन संचालक फुटल्याचा आकडा असताना अशोक पवारांचे तब्बल चार संचालक फुटल्याचे पदाधिकारी निवडीत स्पष्ट झाले.
यामुळे हा अशोक पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी अनेक ठिकाणी अशोक पवार यांना धक्क्का देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे शिरूर खरेदी विक्री संघाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.