Shirdi : पुन्हा मास्क सक्ती! शिर्डीत मास्क नाही तर दर्शन नाही, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय..

shirdi : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे पुन्हा देशासह राज्यात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दर्शनासाठी मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रांगेच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना मास्क देण्याच्या सुविधा उपलब्ध करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. ज्या भाविकांकडे मास्क नसेल, त्यांना दर्शनासाठी प्रवेश देऊ नये, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाला दिल्या आहेत.
तसेच साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्याने शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला सातत्याने येतात. मात्र आता कोरोनाच्या जेएन१ या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीत साई दर्शनासाठी येणा-या भाविक आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिली आहे. shirdi
दरम्यान, या सूचनेची अंमलबजावणी बुधवारपासूनच केली जाणार असल्याने आता दर्शनासाठी येणा-या साई भक्तांना तसेच ग्रामस्थांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.