शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी बैठक अर्धवट सोडून गाठले ब्रीच कँडी…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली पक्षाची बैठक सोडून तातडीने रुग्णालय गाठले.

तपासणीनंतर डॉक्टरांनी केले दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज अस्वस्थ वाटत असल्याने ते नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

सुप्रिया सुळेंनी अर्धवट सोडली पक्षाची बैठक
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडली आणि थेट ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेतली. या बैठकीला शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांची भेट घेऊन पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

दिवाळीतही बिघडली होती प्रकृती
यापूर्वी दिवाळीच्या काळातही शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शरद पवार पुन्हा सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले होते. कालच त्यांनी पुण्यात ऊस उत्पादनासंदर्भातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराची माहिती घेतली होती. मात्र, आज पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!