लोणी काळभोर येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या राख्या..

उरुळी कांचन : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ च्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी अतिशय कलात्मक राख्या बनवल्या आहेत
या राख्या पोष्टाद्वारे बर्फाळ प्रदेश असलेल्या हग्राम कुपवाडा (जम्मू काश्मीर) व आवरपत्ती नेरमांद (हिमाचल प्रदेश) या ठिकाणी पाठवण्यात आल्या. तसेच भारतीय सीमेवर काम करणारे भारतीय सैन्य दलातील रणजीत खारवे यांच्या हस्ते या सर्व राख्या हग्राम कुपवाडा (जम्मू काश्मीर) व आवरपत्ती नेरमांद (हिमाचल प्रदेश) या दोन्ही ठिकाणी पोस्टाने रवाना केल्या आहेत.
हवेली तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशा प्रकारचा उपक्रम घेण्यात आला, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भरत इंदलकर यांनी दिली.
सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी मागील आठ-दहा दिवसांपासून लोकरीसह अन्य विविध वस्तूंचा उपयोग करत राख्या तयार केल्या आहेत.
या माध्यमातून विद्यार्थिनींच्या अंगभूत कलागुणांना वाव देत नवनिर्मितीची संधी प्राप्त करून देण्यात आली. राख्या तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, साधनांची उपलब्धता शाळेने करून दिली होती.
प्रथम ध्वजाच्या प्रतिकृतीला राखी बांधण्यात आली. त्यानंतर या राख्या त्यांनी भारतीय जवानांसाठी पोष्टाद्वारे पाठवल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी देशाच्या सैनिकांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनील जाधव यांनी संवाद साधत राख्या बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखवले. या प्रात्यक्षिकांच्या आधारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ५०० व त्यापेक्षा जास्त राख्या तयार केल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी तयार केलेल्या राख्या कुपवाडा (जम्मू काश्मीर) व भागातील सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
त्यासोबत शाळेच्या वतीने भारतीय जवानांसाठी शुभ संदेश देणारे पत्रही पाठवण्यात आले.तसेच यावेळी कल्पकतेने सजविलेला कलात्मक राख्यांचा बॉक्स येथील लोणी काळभोर पोस्टात सुपूर्द करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा गजर केला.
दरम्यान, यावेळी हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भरत इंदलकर, लोणी काळभोर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, अष्टापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शेषराव राठोड, मुख्याध्यापिका सुनंदा यादव यांच्यासह भारतीय सैन्य दलातील रणजीत खारगे यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले आहे.