Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे ‘ते’ दोघे कोण? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती…

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांच्या घराबाहेर दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीही केला होता.
यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती. आता संजय राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली होती, याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी काल त्यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्याचा आल्याचा आरोप केला होता.
शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे.
संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहाणी करणाऱ्या त्या चार व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करण्यासाठी आलेल्या असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. Sanjay Raut
मुंबई पोलिसांनी काल रात्री जारी केलेल्या आपल्या पत्रकामध्ये म्हटले की, आज दिनांक २०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे कळविले की, आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी ०९.१५ च्या सुमारास दोन संशयित इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेले आहेत.
त्यांच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. यामध्ये आढळलेले की, हे चार इसम सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, तशी संबंधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे.