पुरंदर विमानतळाचे लवकरच उड्डाण!! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती, भूसंपादनाची प्रक्रिया होणार सुरू…

पुणे : पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करुन, मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार असून भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीला सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या कामाचे लवकरात ‘टेक ॲाफ’ होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही घोषणा केली आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
तसेच महाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील ‘ सह्याद्री’ येथे पार पडली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डिपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवाय मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असून विमान प्रवाशांची आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोईसुविधांसह सज्ज केलेले आहे. तरीही पुणे शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळ पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाल आहे.