पुण्यात आयटी अभियंता मॉर्निंग वॉकसाठी गेला आणि परत आलाच नाही, घटनेने उडाली खळबळ..

पुणे : आयटी कंपनीत काम करणारा तरुण नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. परंतु पुन्हा परत आला नाही. धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भूगावमध्ये घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय ३९, रा. स्काय मानस लेक, भुकूम, ता.मुळशी) असे मृत तरुणाचे नाव असून तो आयटी कंपनीत काम करत होता. याप्रकरणी हर्षदचा भाऊ राजस चंद्रशेखर पिंगळे (वय ३४) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, हर्षद पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथील स्काय मानस तलाव येथे राहत होता. तो नियमित सकाळी भूगाव ते चांदणी चौक असा धावण्याचा सराव करत होता.
भूगाव येथे पोहोचल्यावर त्याला अचानक चक्कर आले आणि तो खाली कोसळला. एक टेम्पो चालक त्वरित त्याच्या मदतीसाठी धावला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पौंड पोलिस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.