पुणे रिंगरोडच्या कामाला आला वेग!! 42 हजार कोटींच्या कामाला आता 5 ठेकेदार कंपन्यांची निवड…

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा असलेला 42 हजार 711 कोटी रुपये खर्चाच्या रिंग रोडच्या नऊ पॅकेजच्या कामाकरिता आता पाच ठेकेदार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे कामाला गती मिळणार आहे.
यामध्ये नवयुग कंपनीला तीन पॅकेजची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच पीएनसी कंपनीला चार पॅकेजेच्या कामाचे वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मेघा कंपनीला तीन, जीआर आणि रोडवेज या कंपन्यांना प्रत्येकी एक अशा पाच पॅकेजसाठी वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे.
या टेंडर प्रक्रियेमध्ये जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट, पीएमसी इन्फ्राटेक, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा, मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड पात्र ठरले आहेत. यामुळे आता कामाला नेमकं कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या रिंग रोडसाठी आवश्यक असलेले 90% भूसंपादन देखील पूर्ण करण्यात आले आहे. या कामातील भूसंपादनाला विलंब होत असल्यामुळे या प्रकल्पाचे बरेच काम सध्या रखडल्याचे चित्र आहे. आता लवकरच या कामाला गती मिळणार आहे. पुण्यातील अनेक गावांना जोडणारा पुणे रिंगरोड प्रकल्प 170 किलोमीटर लांबीचा होणार आहे.
हा प्रकल्प पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर, पुणे ते बेंगलोर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई सारख्या प्रमुख महामार्गांना देखील जोडला जाईल अशी शक्यता आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.