Pune : पुण्यात दारूड्यानं अख्ख पोलीस स्टेशन लावलं कामाला, एका फोननं उडाली पोलिसांची धावपळ, नेमकं घडलं काय?

Pune : पुण्यात एका मद्यपीनं दारूच्या नशेत पोलिसांना चुकीची माहिती दिली, यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्या या तरुणाविरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित मुकेश चव्हाण असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, त्याचाविरोधात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चव्हाण मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयसमोर थांबला होता. दारूच्या नशेत त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रुम) संपर्क साधला. मला पोलीस मदत हवी आहे.३० ते ४० जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत आहेत.
माझ्या जीवाला धाेका आहे, अशी माहिती त्याने मोबाइलवरुन पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने त्वरीत फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. Pune
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चौकशीत असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समोर आले. रोहित चव्हाण यानं दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून चुकीची माहिती दिल्याचं समोर येताच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे काही काळ पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.