Pune Crime : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाखांच्या बक्षिसाची घोषणा, सरकारचा मोठा निर्णय…

Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत.
या प्रकरणातील आरोपींना हुडकून काढण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. आरोपींची नावे आणि ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
बोपदेव सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २०० हून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती जमा केली आहे. याशिवाय, संशयित आरोपींची रेखाचित्रही जारी करण्यात आली आहेत.
दरम्यान, याआधारे पोलिसांकडून आरोपींना शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांना तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांचा ठावठिकाणा मिळालेला नाही. या नराधमांनी बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.