Pune Crime : म्हाडाच्या रूमचे आमिष दाखवून जोडप्याचा अनेकांना गंडा, पती-पत्नीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Pune Crime पुणे : जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे, म्हाडामध्ये कार्यरत असल्याचे सांगून म्हाडाची पूर्नवसनाची रुम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे पती पत्नींनी अनेकांकडून पैसे घेऊन लाखो रुपंयाना गंडा घातला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी शंकर दिनकर कांबळे (वय. ६५, रा. मंगळवार पेठ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे व तिचा पती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार २०२१ पासून घडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी शंकर कांबळे यांची रेखा कांबळे ही नातेवाईक आहे. त्यांनी म्हाडामध्ये स्वस्तात रुम मिळवून देते, असे सांगितले. त्यांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखविली. त्यांनी आपल्यासाठी व मुलासाठी घर घेण्याचे ठरविले. अगोदर २५ हजार रुपये रोख द्यावे लागतील. (Pune Crime)
त्यानंतर घर मिळाल्यावर ४० हजार रुपये म्हाडामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून भरावे लागतील, असे सांगितले. त्यांना शिंदे वस्ती व म्हाडा कॉलनी येथील घरे लांबून दाखविली. पैसे भरल्याशिवाय घराची चावी मिळत नाही व आतमध्ये प्रवेश देत नाहीत, असे सांगितले.
रेखा कांबळेवर विश्वास ठेवून त्यांनी १६ हजार रुपये दिले. त्यानंतर अनेक महिने झाले तरी घराबाबत काहीही न सांगितल्याने त्यांनी चौकशी केल्यावर आता तुम्हाला घर देणार नाही, असे सांगितले. त्यांच्याप्रमाणेच या पती पत्नीने कोणाकडून ८१ हजार, कोणाकडून २७ हजार, ३० हजार रुपये असे मिळेल, त्यांच्याकडून पैसे घेतले.
दरम्यान, आतापर्यंत १५ ते २० जणांची त्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे सर्व गरीब कुटुंबातील लोक असून त्यांनी काबाड कष्ट करुन पैसे जमवून तिच्या हवाली केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक कवळे तपास करीत आहेत