Politics News : विधानसभेसाठी भाजपने ताकद वाढवली, आता संघही मदतीसाठी मैदानात…

Politics News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली ताकद वाढवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही पक्षाच्या मदतीसाठी मैदानात उतरला आहे. सध्या राज्यात पक्षाची परिस्थिती चांगली झाली आहे, असा भाजपचा विश्वास आहे. हळूहळू ती आणखी चांगली होईल. महायुतीसह भाजपला विजयाचा विश्वास आहे.
महाराष्ट्राशी संबंधित आणि मध्य प्रदेशात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, महायुतीची स्थिती पूर्वीच्या तुलनेत बरीच सुधारली आहे. हळूहळू महाविकास आघाडीला पछाडून महायुती राज्यामध्ये निवडणुकीमध्ये विजय मिळवेल.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखी स्थिती राहणार नाही. दोन्ही आघाड्यांमधील मतांच्या टक्केवारीत फारच कमी फरक असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीला ४३.७१ टक्के तर महायुतीला ४३.५५ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच दोन्ही आघाड्यांमधील मतांमधील फरक केवळ ००.१६ टक्के होता. भाजप आता हे अंतर पार करण्याच्या स्थितीत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची
कामगिरी ज्या भागात खराब होती, त्या भागात विशेष लक्ष ठेवून पक्षाने काम सुरू केले आहे. पन्ना प्रमुखांना जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप कार्यकत्यांचे मनोबल वाढले आहे. कोणताही पक्ष सरकारच्या योजना आणि अंमलबजावणीमुळे नव्हे, तर कार्यकत्यांच्या मनोबलाने निवडणुका जिंकतो, असा विश्वास भाजपच्या नेत्याने व्यक्त केला. Politics News
कार्यकर्ते घरी बसले तर सरकारच्या सर्व योजना फोल ठरतील. कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले तर परिस्थिती उलटायला वेळ लागत नाही. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा उत्साही झाले असून याचा परिणाम लवकरच दिसून येईल.
दरम्यान, महायुती किती जागा जिंकेल, असे विचारले असता ज्येष्ठ नेते म्हणाले की, यावर काहीही बोलणे घाईचे आहे. विशेष म्हणजे याच नेत्याने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला १३५ पेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हटले होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने १६३ जागा जिंकल्या होत्या. आता या नेत्याचा विश्वास महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल असा आहे.