मोठी बातमी! सोलापूर विमानतळावर विमान कोसळले, घटनेने उडाली खळबळ, संपूर्ण परिसरात अलर्ट…

सोलापूर : सोलापूर शहरात विमान कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विमान कोसळल्याची खबर मिळताच नागरिक, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांची पावलं थेट होटगी रोडवरील विमानतळाकडे वळली.
मात्र ही दुर्घटना नव्हे, तर देशभर सुरू असलेल्या मॉक ड्रिलचा (आपत्ती व्यवस्थापन चाचणी) भाग होता. अहमदाबादमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोलापूर विमानतळावर हे रिअॅलिटी बेस्ड ड्रिल राबवण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी सकाळी ११.१० वाजता विमान कोसळल्याची बनावट (मॉक) खबर रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आली. या संदेशानंतर अवघ्या ११ मिनिटांत तीन रुग्णवाहिका आणि दोन अग्निशमन गाड्या विमानतळावर दाखल झाल्या. यामध्ये रघोजी, यशोधरा, अश्विनी रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांचा समावेश होता. १०८ आपत्कालीन सेवाही सक्रिय झाली आहे.
दरम्यान, अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होताच केवळ १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. ही संपूर्ण कारवाई तितकीच खऱ्या घटनेप्रमाणे पार पडली. विशेष म्हणजे मदतकार्याच्या वेळी माध्यम प्रतिनिधी, प्रवाशांचे नातेवाईक यांच्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करून गोंधळ टाळण्यात आला.
या साऱ्या प्रक्रियेवर विमानतळ प्रमुख अंजनी शर्मा, अग्निशमन अधिकारी राकेशकुमार यांनी बारकाईने निरीक्षण ठेवले. त्यांच्या उपस्थितीतच मदतकार्यातील अडचणी, वेळेचे नियोजन आणि प्रतिसाद यांची नोंद घेतली गेली. तसेच उत्तर सोलापूरचे तहसीलदार नीलेश पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघमारे व अन्य अधिकारीही उपस्थित होते.