देशातील ७ राज्यांसाठी २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान पावसाचा ऑरेंज अलर्ट, काळजी घेण्याचे आवाहन…

नवी दिल्ली : देशात सध्या काही ठिकाणी दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. आता अतिवृष्टी, भूस्खलन यामुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या समस्या आणखी वाढू शकतात.
भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. या सात राज्यांसाठी २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या राज्यांमध्ये २५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ताही नष्ट झाली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ११५.६ ते २०४.४ मिमी पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच या काळात बाधित भागात पूर आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचे सांगितले. याशिवाय वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राजस्थान तसेच ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशातही २२ आणि २३ ऑगस्ट रोजी ११५.६ ते २०४.४ मिमी अतिवृष्टी अपेक्षित आहे. २१ ते २४ ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.