हातांवर, मांडीवर, पाठीवर…,वैष्णवी हगवणेच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन आणि भयंकर वळण मिळाले आहे, कारण वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.

तसेच हा अहवाल केवळ गळफासामुळे मृत्यू झाल्याचे दर्शवत नाही, तर वैष्णवीला संपूर्ण शरीरावर झालेल्या जबर मारहाणीमुळेही तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी केलेला हत्येचा आरोप अधिक बळकट झाला आहे.
वैष्णवी हगवणेचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. या छळाला कंटाळून वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली असे सुरुवातीला म्हटले गेले. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला होता. वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तिचे घरचे रुग्णालयात गेले, तेव्हा ‘आमच्या मुलीला काय झाले?’ अशी विचारणा केली असता, तिच्या जावयाने, तुझ्या मुलीला मारून टाकले, असे धक्कादायक उत्तर दिले होते.

वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहिल्यानंतर तिच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. वैष्णवीच्या जाण्याने पिंपरी-चिंचवडमधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता हा शवविच्छेदन अहवाल समोर आल्याने ‘आत्महत्या की हत्या’ या चर्चांना आणखी बळकटी मिळाली आहे.

शवविच्छेदन अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, गळफास घेतल्याने झालेल्या मृत्यूसोबतच, वैष्णवीला संपूर्ण शरीरावर जबर मारहाण झाल्याचे व्रण दिसून येत आहेत. या व्रणांमुळे तिचा मृत्यू मारहाणीमुळे देखील झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता पोलिसांना या प्रकरणाचा मारहाणीच्या दृष्टीने देखील तपास करावा लागणार आहे, ज्यामुळे सत्य समोर येऊ शकेल.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. तिचे दोन्ही हातांवर, दोन्ही मांडीवर, पायांवर, पाठीवर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा दिसून आल्या आहेत.
याशिवाय, तिच्या गळ्याच्या हनुवटीवर कसलातरी लालसर वणही दिसून आला आहे, ज्यामुळे तिच्या मृत्यूबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. या अहवालामुळे, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप अधिक ठोसपणे सिद्ध होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आता तीव्र झाली आहे.