नितेश राणे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले EVM म्हणजे एव्हरी व्होटअगेन्स्ट मुल्ला…

मुंबई : मंत्री नितेश राणे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आज ते सांगलीमध्ये बोलताना असताना पुन्हा एकदा त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका स्पष्ट ठेवली आणि हिंदूंनी एकत्र येऊन मतदान केलं, म्हणून आता हे EVM च्या नावाने बोंबलत आहेत असं नितेश राणे म्हणाले आहेत.
नितेश राणे म्हणाले, ईव्हीएमच्या नावाने विरोधक बोंबलत आहे. त्यांना सहन होत नाही की हिंदू म्हणून सर्व समाज एकत्र येऊन कसे मतदान करतोय. ईव्हीएमला दोष देत आहेत.
या लोकांना ईव्हीएमचा फुल फॉर्मच समजलेलं नाही. हिंदू समाजाने कोणत्या विचाराने मतदान केले हे यांना कळालेच नाही. ईव्हीएमचा अर्थ होतो की एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला… मी ईव्हीएममुळेच निवडून आलो आहे.
भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतावरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे, मी मतासाठी कोणत्याही मोहल्यात गेलो नव्हतो.
तसेच ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिलं आहे त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे, असे मोठे विधान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
शुक्रवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदूचे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणेंनी केले आहे. राणेंनी विशाळगडाच्या उरुसाचा मुद्दा पुन्हा गिरवला आहे.
ते म्हणाले, येत्या १२ तारखेला विशाळगड येथे होणारा उरुसाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, दोषींवर कडक कारवाई केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा घाणेरडा शब्द पुढे आणला. ज्यांना सर्वधर्मसमभाव याची टेप लावायची असेल तरी पाकिस्तानात जाऊन लावावी, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घेरले आहे.