बेंगळुरूमध्ये रहस्यमय मृत्यू! पूजाच्या खोलीतील भिंतींवर शब्दांचं कोडं … नेमकं काय घडलं?

बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये पूजा नावाच्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ती आपल्या रूममध्ये नग्न अवस्थेत मृत आढळल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

तपासादरम्यान पोलिसांना तिच्या खोलीत भिंतींवर चिकटवलेले कागद सापडले असून त्यावर “शांती, अहंकार, विश्वास, संतुष्टी, प्रेम आणि एकाकी प्रेम” असे शब्द लिहिलेले होते. तसेच खोलीत विविध कार्ड्स विखुरलेले आढळले आहेत, ज्यामुळे प्रकरण अधिक गूढ बनले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पूजाचा मोबाईल मागील तीन महिन्यांपासून बंद होता. रिचार्ज संपल्यामुळे तिचा नंबर निष्क्रिय झाला होता आणि ती पूर्णपणे एकाकी जीवन जगत होती. ती नैराश्यात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या काळात ती कशी जगत होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पूजा पूर्वी तंत्रज्ञ म्हणून काम करत होती, मात्र काही वर्षांपूर्वी तिने नोकरी सोडली होती. तिच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून बँक खात्यांचा तपशील तपासला जात आहे. तसेच तिने नोकरी का सोडली याबाबत कंपनीकडून माहिती घेतली जात आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, कोरोना काळात तिचे लग्न झाले होते, मात्र पतीच्या निधनानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ती बेंगळुरूला गेली आणि कुटुंबाशी संपर्क तोडला.
सध्या पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत असून घरमालक आणि तिच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू आहे. कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासातून या रहस्यमय मृत्यूमागचं सत्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.