Murlidhar Mohol : ‘मुरलीधर मोहोळ होणार मुख्यमंत्री?’ सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांवर स्पष्टच म्हणाले…

Murlidhar Mohol : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीला निवडणुकीत २८८ पैकी २३५ हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आधी चार दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता.
बिहार पॅटर्न राज्यात राबवावा अशी मागणी शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात येत होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवूनही आता तीन दिवस झाले आहेत.
मात्र तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावर निर्णय झाला नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. Murlidhar Mohol
महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला असल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले तर आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत दिली आहे.