‘दैवी शक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? भोंदू अशोक खरात आता EDच्या जाळ्यात; ७० कोटींच्या व्यवहारांची चौकशी सुरू

नाशिक : स्वतःकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचा दावा करत लोकांना जाळ्यात ओढणारा भोंदू अशोक खरात आता थेट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आला आहे. आधी शिर्डी पोलिस आणि एसआयटीच्या चौकशीत अडकलेल्या खरातच्या अडचणी आता आणखी वाढल्या असून, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीने त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयानेही ईडीचा ताबा अर्ज मंजूर केल्याने मंगळवारी खरातला अधिकृतपणे ईडीच्या ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

शिर्डीतील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीकडून त्याचा ताबा शिर्डी पोलिसांकडे देण्यात आला होता. मात्र चौकशीदरम्यान समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे आता प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. ईडीकडून खरातच्या बँक खात्यांची, मालमत्तांची, डिजिटल व्यवहारांची आणि विविध माध्यमांतून जमा झालेल्या पैशांच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरातने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून ‘बेनामी’ खात्यांच्या नेटवर्कमधून तब्बल ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळविल्याचा संशय आहे. ही रक्कम नेमकी कुठे गुंतवली गेली, कोणत्या खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली आणि या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास ईडीकडून केला जाणार आहे.

या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) कारवाई करत ईडी डिजिटल पुरावे, आर्थिक कागदपत्रे, मालमत्ता आणि संशयित व्यवहारांचा मागोवा घेणार आहे. तपासादरम्यान आणखी काही नवे चेहरे आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भोंदू अशोक खरातविरोधातील आरोपही गंभीर आहेत. पीडित महिलांना ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली धमकावणे, मुलांना ठार मारण्याची भीती दाखवणे आणि मानसिक दबाव टाकून पैसे उकळल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. काही पीडितांनी तर खरातने त्यांच्या अडचणींचा फायदा घेत फसवणूक केल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याही अडचणी वाढताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी एसआयटीने तब्बल साडेपाच तास त्यांची चौकशी केली होती. आता ईडीकडूनही त्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पदाचा गैरवापर, शिवनिका संस्थेतील सहभाग आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही बाबींची पडताळणी ईडीकडून केली जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर यांच्या चौकशीचा अहवाल एसआयटी पुढील तीन ते चार दिवसांत शासनाला सादर करणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.