वाल्मिक कराडच्या शरणागतीवर खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठं वक्तव्य, म्हणाल्या, कराड शरण आले हा शब्द….

आज बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड याने पुणे येथे सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन सरेंडर केलं. यामुळे मोठ्या घडामोडी घडल्या. यामुळे आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कराड शरण आले हा शब्द योग्य वाटत नाही. शरण आले तरी समाधान नाही, तर त्याला अटक झाली पाहिजे होती.
तसेच त्या म्हणाल्या, एक व्हिडिओ व्हायरल होतो, तरी आरोपी समोर येत नाही. चीड येणारे व्हिडिओ व्हायरल करून शरण होतात, हे दुर्दैवी आहे. अनेक आठवडे या विषयाचा चॅनलवर रोष दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीचे कौतुक केले तितके कमीच आहे. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढायला हवं आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजित पवार त्यांचे मित्र पक्ष आहेत. कुटुंबीयांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि आम्ही पण घेतली आहे. शरद पवार हे या कुटुंबांना भेट देणारे पहिले नेते होते. त्यानंतर तपासाला वेग आला. पोलीस आणि मीडिया आरोपीचा शोध घेत आहे याचीच गंमत वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सर्वतोमुखी चर्चा असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुन झाली, असा आरोप केला जात आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला. काहीवेळापूर्वीच ते स्वत:हून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले.