FRP एकरकमी देण्याचे सूत्र माळेगावने स्वीकारले, प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर, शेतकरी संघटनेकडून संचालक मंडळाचे अभिनंदन….

बारामती : नुकताच आलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून एफआरपीचा निर्णय माळेगावने स्वीकारला आहे. एकरकमी देण्याबाबतचा केलेला आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम माळेगावने स्वीकारला. यामुळे शेतकरी संघटनेने संचालक मंडळाचे आभार मानले आहेत. १ ते १५ मार्चच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट माळेगाव कारखान्याने प्रतिटन ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले.
आता ३१३२ ही रक्कम एफआरपी पेक्षा अधिकची आहे. महाराष्ट्रात एफआरपी एकरकमी देण्याचे सूत्र सर्वप्रथम माळेगावने स्वीकारले आहे, असा दावा अध्यक्ष केशवराव जगताप यांनी केला आहे. माळेगावने २३४ रुपये प्रतिटन उत्पादन खर्च कमी करीत सभासदांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी ३६३६ अंतिम ऊस दर दिला.
तसेच चालू हंगामातही प्रतिटन ३१३२ रुपये सर्वाधिक दर शेतकऱ्यांना दिला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन २०० रुपये देण्याचे नियोजन केले. साखर कामगारांना आजवर विक्रमी बोनस व रजेचा पगार दिला असल्याचे देखील केशव जगताप यांनी सांगितले आहे.
तसेच व्हीएसआय संस्थेने अजित दादा नेतृत्व करीत असलेल्या माळेगावला उत्कृष्ट अर्थिक नियोजनाचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला. अशी उत्तम अर्थिक स्थिती असताना विरोधक माळेगावची बदनामी करतात. असेही ते म्हणाले. यंदाचा गळीत हंगाम १३० दिवसांचा ठरला.
या कालावधीत सुमारे ११ लाख २५ हजार टन ऊसाचे गाळप करण्यात यश आले. त्यापैकी गेटकेनधारकांनी ३ लाख ३६ हजार ८२४ टन ऊस देऊन माळेगावर विश्वास दाखविला, असेही जगताप म्हणाले. यावेळी संचालक तानाजी देवकाते, मंगेश जगताप, मदनराव देवकाते, सागर जाधव, संजय काटे, दत्तात्रेय येळे, पंकज भोसले, बन्शीलाल आटोळे, निशिगंध निकम आदी उपस्थित होते.