कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! सरकार मैदानात उतरलं; शेतकऱ्यांकडील कांदा आता थेट खरेदी होणार, मोठी घोषणा समोर…


नवी दिल्ली : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांकडील कांदा सरकार खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारकडून १२.३५ रुपये प्रति किलो म्हणजेच १२३५ रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला जाणार आहे.

शिवराजसिंह चौहान हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे बाजारभाव कोसळल्याचे चौहान यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नाफेडला कांदा खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य मानले जाते. मात्र, सध्या कांद्याला मिळणारा कवडीमोल दर पाहता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतरही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. १२३५ रुपये प्रति क्विंटल हा दर अपुरा असून, या पैशांतून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने कांदा विकला आहे, त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही कांदा उत्पादक संघाकडून देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!