मुलगा गमावल्याचं दुःख, पत्नीच्या नैराश्याचा आधार की मुलांच्या तस्करीचा धक्कादायक कट? 3 लाखांच्या सौद्यानंतर 7 जण गजाआड


जालंधर : 18 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाने पत्नीच्या नैराश्यावर उपाय म्हणून चिमुकल्याला घरी आणण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय कायदेशीर दत्तक प्रक्रियेतून न जाता थेट तीन लाख रुपयांच्या कथित सौद्यापर्यंत पोहोचला आणि अखेर संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या हाती लागल्याने सात जणांना जेलची हवा खावी लागली आहे.

पंजाबमधील जालंधर येथील हरजिंदर कुमार यांचा 18 वर्षीय मुलगा 2025 मध्ये आजारपणामुळे दगावला होता. या धक्क्यानंतर पत्नी मानसिक तणावात गेल्याचे सांगितले जाते. कुटुंबीयांनी दत्तक मूल घेण्याचा सल्ला दिल्यानंतर हरजिंदर मुलाच्या शोधात होते. याचदरम्यान त्यांच्या घरात काम करणाऱ्या नीलम नावाच्या महिलेने बिहारमधून मूल मिळवून देण्याची तयारी दर्शवली.

त्यानंतर बिहारच्या मुंगेरमधील काही व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. एका चिमुकल्याचा फोटो पाठवण्यात आला आणि तो पसंत पडताच तीन लाख रुपयांत मुलगा देण्याचा कथित करार ठरल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मते, यानंतर मुलाचे अपहरण करण्याची योजना आखण्यात आली. आरोपींनी मुलाला घराजवळून कारमध्ये बसवून पंजाबकडे रवाना होण्याचा प्रयत्न केला.

मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच मुंगेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. भोजपूर जिल्ह्यातील आरा महामार्गावर संशयित वाहन अडवण्यात आले. कारमधून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 2 लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान आणखी काही संशयितांची नावे समोर आली आहेत. पोलिसांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, हा प्रकार केवळ बेकायदेशीर दत्तक प्रक्रियेचा होता की यामागे मुलांच्या तस्करीचे मोठे जाळे कार्यरत आहे? या दिशेने तपास वेगाने सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!