ठेकेदारासाठी आमदारांची मनपा आयुक्तांना धमकी; पुणे महापालिकेत नेमकं चाललंय काय?


पुणे : महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता प्रकल्पातील निविदेत मर्जीतील ठेकेदाराला काम मिळाले नसल्याने पुण्यातील एका आमदाराने महापालिका आयुक्तांनाच ‘गुन्ह्यात अडकवतो,’ अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

तसेच पथ विभागातील अधिकाऱ्यांना ‘विधानसभेत तुमच्याविरोधात हक्कभंग आणतो,’ अशी दमबाजी केल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि सुमारे दोन किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत आठ ठेकेदार सहभागी झाले होते.

निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी संबंधित आमदाराकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे समोर आले. या हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडली होती.

दरम्यान, अनेक महिने निविदा प्रक्रिया प्रलंबित राहिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नियमानुसार प्रक्रिया पुढे नेण्याचे आणि ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार झालेल्या छाननीत आमदारांकडून अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात असलेला ठेकेदार गुणवत्तेच्या निकषांवर पात्र ठरला. विशेष म्हणजे, आमदारांच्या मर्जीतील ठेकेदाराच्या तुलनेत या पात्र ठेकेदाराने सुमारे नऊ कोटी रुपये कमी खर्चाची निविदा सादर केली. त्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होणार आहे.

मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी महापालिकेत अनेकदा पाठपुरावा करूनही यश न आल्याने संबंधित आमदाराने आयुक्तांना फोन करून ‘गुन्ह्यात अडकवतो,’ अशी धमकी दिल्याची माहिती आहे. तसेच पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता, आमदाराकडून धमकी दिल्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला. मात्र, संबंधित आमदाराचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!