मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली! गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल, नेमकं काय घडलं?


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आणि त्यादरम्यान झालेल्या सततच्या सभा, बैठका तसेच प्रवासामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध शहरांमध्ये सभा घेतल्या, मराठा समाजातील नागरिकांशी संवाद साधला तसेच अनेक बैठकांना उपस्थिती लावली. रात्री उशिरापर्यंत सभा आणि त्यानंतर शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

दौऱ्यात बावनकुळेंवर निशाणा

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली होती. मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रांबाबत बीडमध्ये चुकीचे आदेश देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

एका सभेत जरांगे पाटील यांनी बाहुबली चित्रपटातील संवादाची नक्कल करत बावनकुळे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. मराठा समाजाच्या आड येणाऱ्यांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, 28 ऑगस्टपूर्वी जात प्रमाणपत्रांबाबत झालेली चूक दुरुस्त करून रद्द करण्यात आलेली प्रमाणपत्रे वैध करण्याची मागणी त्यांनी केली. यापुढे मराठा समाजाच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, दौरा संपल्यानंतर प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!