‘दुष्काळ हा इतिहासजमा करणार!’ फडणवीसांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा; 56 लाख शेतकरी, नदीजोड प्रकल्प अन् महाराष्ट्रासाठी नवा मास्टरप्लॅन

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासंदर्भात मोठी घोषणा करत राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्रालयातील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात राज्याला संबोधित करताना फडणवीस यांनी महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा सर्वात मोठा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक राहणार असून, राज्य हे देशाचे खरे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचा दावा त्यांनी केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राने 8.8 टक्के आर्थिक विकासदर नोंदवला असून, प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र आर्थिक शक्तीकेंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कल्याणावर बोलताना त्यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’चा उल्लेख केला. या योजनेतून 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याचे सरकारचे स्वप्न वेगाने पूर्ण होत असून, सध्या 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात हा आकडा 100 टक्क्यांवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.


महिला सक्षमीकरणाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. महिलांना अधिकृतपणे शेतकरी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे सांगत, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
युवकांसाठी रोजगार आणि उद्योगनिर्मितीवर भर देताना फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. स्टार्टअप, उद्योग आणि नव्या रोजगार संधींमुळे महाराष्ट्र आता देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. राज्यातील प्रत्येक तरुणाला संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख करत, महाराष्ट्राचा विकास सर्वसमावेशक आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गडचिरोली, नंदुरबार, पालघर यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळमुक्त महाराष्ट्र, 100 टक्के दिवसा वीज, लाखो शेतकऱ्यांना दिलासा, महिलांना शेतकरी दर्जा आणि युवकांसाठी रोजगाराचा रोडमॅप अशा अनेक मोठ्या घोषणांमुळे फडणवीसांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आगामी काळातील सरकारच्या प्राधान्यक्रमांची झलक देणारे ठरले.