पुण्याच्या ससून रुग्णालयात मोठी लाचखोरी, १ लाखाची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई…

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात एसबीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना एसीबीने लाच घेताना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही अधिकारी एक लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
ससून रुग्णालयाच्या आवारातील, ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वरिष्ठ सहाय्यक आणि एक कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे.
ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचरचा पुरवठा करण्याकरिता दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान, याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं.अशी माहिती एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १३% दराने १ लाख ३० हजार रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी मागितली. वाटाघाटीनंतर आरोपींनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली. तक्रारदार व्यावसायिकाने एसीबीकडे याबाबतची तक्रार दाखल केली.
पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आणि ससून परिसरात सापळा रचण्यात आला. आणि जयंत चौधरी आणि सुरेश बोनावळे यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान ही कारवाई एवढ्यावरच न थांबता एसीबीमार्फत त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.