Maharashtra Politics : अंतर्गत वादाचा फटका, आता महायुतीतील नेतृत्वाने घेतला मोठा निर्णय…

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सध्या भाजपाप्रणित महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांचा गटही या सरकारमध्ये सहभागी झाला.
तसेच ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर ४१ आमदार असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत.
अशातच आता महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील नेते मित्र पक्ष असलेल्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे सातत्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेत निर्माण होत आहेत.
महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे. शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. Maharashtra Politics
तसेच तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भाजप , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहेत. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल. या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणाचीही अधिकृत भूमिका नसणार, असा निर्णय महायुतीने घेतल्याची माहिती मिळत आहे.