मामाच्या गावाला जाऊया…एसटीकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक, दररोज लांब पल्ल्याच्या होणार ‘इतक्या’ फेऱ्या..

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत आहे. सुट्टी सुरू होताच लगेच लोकांची नातेवाईकांकडे, गावाला जाण्याची लगबग सुरू होते. लहान मुलांनीह मामाच्या नाहीत मावशीच्या, आजी-आजोबांकडे जाण्याची उत्सुकता असते..
उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा गाड्यांची वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर दि.१५ एप्रिल २०२५ पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील ७६४ जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन ५२१ नियतांद्वारे २.५० लाख किमी चालविण्यात येणार आहे.
दरम्यान उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प.महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.