तिचा फोन नेहमी बिझी, माझ्याशीच भांडायची’; केतनने लग्नाआधीच व्यक्त केली होती भीती, पण पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं!

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील तपासात दररोज नवे खुलासे होत असून, आता समोर आलेली माहिती या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी ठरत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, होणारी पत्नी सिया गोयलच्या वागणुकीत झालेला बदल केतनच्या लक्षात आला होता. लग्नाआधीच त्याने कुटुंबीयांकडे आपली चिंता व्यक्त केली होती. मात्र, तो संशय इतक्या भयानक शेवटाकडे नेईल, याची कोणालाच कल्पना नव्हती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिया अनेकदा छोट्या-छोट्या कारणांवरून वाद घालत होती. केतन फोन करत असताना तिचा मोबाईल वारंवार व्यस्त लागत असे. एका विशिष्ट व्यक्तीशी तिचे सातत्याने बोलणे सुरू असल्याची शंका त्याला आली होती. याबाबत त्याने वडील विशाल अग्रवाल यांच्याशी चर्चा करत, “लग्नाआधी तिच्याबद्दल पूर्ण माहिती काढा, नंतर अडचण नको,” अशी विनंती केल्याचे समोर आले आहे.
याच काळात ६ जूनला दोघांचा बाली दौरा ठरला होता. मात्र ऐनवेळी सियाने काही कारणे देत हा प्रवास रद्द केला. या निर्णयानंतर केतनचा संशय आणखी वाढला. त्याने सियाच्या वागण्यात अचानक झालेल्या बदलाबद्दलही कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, “वय कमी आहे, स्वभावात अपरिपक्वता असू शकते,” असे सांगत त्याची समजूत काढण्यात आली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंधांमुळेच हा संपूर्ण कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दोघांचे मोबाईल, कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित तांत्रिक माहितीची तपासणी सुरू केली आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीत मुलाने वारंवार व्यक्त केलेल्या संशयाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत आरोपींच्या परस्पर संपर्काचा आणि हत्येपूर्वीच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे.
दरम्यान, हे हत्याकांड केवळ प्रेमसंबंधांपुरते मर्यादित नसून त्यामागे पूर्वनियोजित कट होता का, आर्थिक किंवा इतर कारणे होती का, याचाही तपास सुरू आहे. अंतिम तपास अहवाल आणि न्यायवैद्यकीय पुराव्यानंतरच या बहुचर्चित प्रकरणातील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.