‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला यांचे निधन, वयाच्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिग बॉस १३ आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
शेफालीने २००४ मध्ये मीत ब्रदर्समधील संगीतकार हरमीत सिंहसोबत लग्न केलं होतं मात्र ते फारकाळ टिकलं नाही. त्यांनी २००९ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शेफालीने हरमीतवर काही आरोप केले होते.
त्यानंतर, २०१५ मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीसोबत दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेफालीला एक गोंडस मुलं हवं होतं मात्र काही अडचणी येत असल्याने त्यांनी मुलं दत्तक घेण्याचा विचारही केला होता. मात्र तिचं ते स्वप्न पूर्ण होता होता राहीलं.