काळजी घ्या! डोळ्याच्या साथीने वाढवले टेंशन, तीन लाखांहून अधिक रुग्ण..

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली आहे. पुणे जिल्ह्यातही या साथीने डोके वर काढले असून अनेकांचे डोळे येणे सुरू झाले आहेत. लहान मुलांचे देखील डोळे येत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे.
राज्यभरात ९ ऑगस्टपर्यंत ३ लाख ५७ हजार रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरात रुग्णसंख्येत सुमारे दीड लाखांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
तसेच राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे.
दिवसागणिक शहरात काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक जणांना या साथीने ग्रासलं असून राज्यात ३ ऑगस्टला रुग्णसंख्या १ लाख ८७ हजार होती. ती ९ ऑगस्टपर्यंत वाढून ३ लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती आहे.