विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत वाढवली, जाणून घ्या..

पुणे : इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. असे असताना आता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेला आता 5 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इन हाऊस कोट्या अंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात 10 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे वेब साईटवर इन हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलांना दिलासा मिळाला आहे. याबाबत काही मुलांनी आणि पालकांनी मागणी केली होती. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी सांगितले.
संकेतस्थळावर महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत आहे, असे सांगितले आहे.
यामध्ये इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही सांगितले गेले आहे.