UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी! १ ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल, जाणून घ्या…

पुणे : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्रणालीमध्ये १ ऑगस्ट २०२५ पासून मोठे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने २१ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात या नियमांची घोषणा केली आहे.
या नव्या नियमांमुळे बँका व पेमेंट सेवा प्रदात्यांना UPI नेटवर्कवरील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १० API वर नियंत्रण आणावे लागणार आहे. या API मध्ये बॅलन्स तपासणे, ऑटोपेमेंट सुरू करणे, व्यवहारांची स्थिती पाहणे अशा सेवांचा समावेश आहे. NPCI चा उद्देश म्हणजे UPI प्रणालीवरचा ताण कमी करणे आणि व्यवहारांची गती अधिक सुरळीत राखणे.
बॅलन्स तपासण्याची मर्यादा..
ऑगस्टपासून प्रत्येक ग्राहकाला एका UPI अॅपवरून दररोज फक्त ५० वेळा शिल्लक तपासण्याची परवानगी असेल.
पीक अवर्समध्ये API व्यवहार बंद..
सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या गर्दीच्या वेळात ग्राहकांच्या परवानगीशिवाय API द्वारे ऑटोपेमेंट, बॅलन्स तपासणी आदी व्यवहार बंद राहतील.
ऑटोपेमेंटचे वेळापत्रक
आता ऑटोपेमेंट्स फक्त नॉन-पीक अवर्समध्येच कार्यान्वित होतील. प्रत्येक ऑटोपेमेंटसाठी एक मुख्य प्रयत्न आणि तीन पर्यायी प्रयत्नांची मर्यादा असेल.
संदेशाद्वारे शिल्लक माहिती..
प्रत्येक यशस्वी UPI व्यवहारानंतर बँकांनी ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम एसएमएस किंवा अॅप नोटिफिकेशनद्वारे पाठवावी, असे निर्देश आहेत.
व्यवसायिकांसाठी चिंता, पण सेवा सुरळीत ठेवण्यावर भर..
Bzeepay चे CEO मुशर्रफ हुसेन यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांना वारंवार शिल्लक रक्कम तपासण्याची गरज असते, त्यामुळे ही मर्यादा काही अडचणी निर्माण करू शकते. मात्र NPCI चा उद्देश म्हणजे UPI सेवा सतत चालू राहावी आणि सर्व वापरकर्त्यांना सुरळीत अनुभव मिळावा, हे आहे.