विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी कसे निवडले जाते मानाचे वारकरी दाम्पत्य? जाणून घ्या..

पंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरनगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही लाखो भाविकांचे पंढरीत आगमन होत आहे. आषाढी एकादशी सोहळ्यात सामील होण्यासाठी निघालेल्या मानाच्या सर्व पालख्या पंढरपूरात दाखल होत आहे. यामुळे प्रशासनाची देखील जोरदार तयारी सुरु आहे.
सध्या अवघी पंढरी दुमदुमली आहे. सध्या पालखी सोहळा पंढपूरमध्ये दाखल होत आहे. तसेच आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे. एकादशीला पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. या पूजेवेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो.
लाखो वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपुरात पायी चालत येतात. पायी वारीत वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता गाणे गात, भजने म्हणत टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल-रुख्मिणीच्या चरणी लीन होतात. मुख्यमंत्र्यांसोबत एक वारकरी दाम्पत्य उपस्थित असते. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला असतो.
विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाल्यावर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते. यावेळी दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान दिला जातो. यामध्ये जे दाम्पत्य त्या क्षणी दर्शन रांगेत सर्वात समोर असेल, त्यांना पूजेसाठी निमंत्रित केले जाते.
याबाबत मंदिर समिती हा मान देते. याशिवाय, मंदिर समितीमार्फत त्यांचा सत्कारही केला जातो. ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि साध्या पद्धतीने केली जाते. ज्यात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा वशिल्याला स्थान नसते. केवळ आषाढीला दर्शन रांगेत सर्वात पुढे असण्याचा योग महत्त्वाचा ठरतो. यामुळे हे व्यक्ती फार नशीबवान असतात.